रत्नागिरी:- शहरातील मांडवी भूते नाका येथे सोमवारी रात्री एका मध्यधुंद तरुणाने मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणावर धारदार हत्याराने वार केल्याच्या गंभीर घटनेतील आरोपीला १५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर वाडा येथील रहिवासी अरमान इनामदार (२९) या तरुणावर अंकुश मांडवकर या तरुणाने हल्ला केला होता. मिरकरवाड्याकडे घरी जात असताना मांडवी भूते नाक्याजवळ अंकुश मांडवकर याने अरमानला अडवून त्याच्या डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार केले होते. यात अरमान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
हल्ला करणारा आरोपी अंकुश मांडवकर याने घटनेपूर्वी परिसरात बराच वेळ धिंगाणा घातला होता. त्याने स्थानिकांनाही धमकावले आणि एका वाहनाची काचही फोडली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी आरोपी अंकुश मांडवकर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९ नुसार खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.









