मांडवी जेटीवर फिरायला आलेल्या नागरीकांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी:- विकेंड लॉकडाऊन असतानाही रत्नागिरी शहरातील मांडवी जेटीवर फिरायला आलेल्यांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे फिरण्यासाठी आलेल्यांचा मुड ऑफ झाला होता. यामध्ये सर्वाधिक तरुण-तरुणींचा समावेश होता.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे रत्नागिरीतील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चाचण्या वाढल्या तरीही बाधित अधिक असल्यामुळे राज्य शासनाने निर्बंध कायम ठेवले आहेत; मात्र निर्बंधांमध्ये अडकलेले नागरिक मोकळा श्‍वास घेण्यासाठी वेळ शोधत आहेत. जिल्ह्यात विकएंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तरीही रविवारी सायंकाळी मांडवी समुद्रावरील जेटीवर फिरायला आलेल्यांची प्रचंड गर्दी होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरवात केली. सुमारे शंभरहून अधिक लोकांना पकडले आहे. नागरिकांनी जबाबदारीचं भान राखावे असे प्रशासन आवाहन करत असताना त्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.