मांडवी एक्स्प्रेसमधून महिलेचे 60 हजाराचे दागिने लंपास 

खेड:- मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील 60 हजार 400 रूपये किमतीचे दागिने अनोळखी व्यक्तींनी लंपास केले. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निशात अलिमुद्दीन कादिरी (37, रा. राजीवडा- रत्नागिरी) यांनी तक्रार नोंदवली आहे. त्या 23 फेब्रुवारी रोजी मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. एक्स्प्रेस खेड रेल्वेस्थानकात उभी असताना दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी यांच्याशी संगनमताने भांडण करत हाताच्या थापटाने त्यांना चापट मारली. या दरम्यान, फिर्यादीच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व शोल्डर पर्समधील 10 हजार रुपये असा 60 हजार 400 रूपयांच्या ऐवजासह पोबारा केला. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर सर्वप्रथम रेल्वेस्थानकात या बाबतची कल्पना दिली. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलीस करत आहेत.