मांडवीत मनोविकृत हल्लेखोराचा दुचाकीस्वार तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

तरुण गंभीर जखमी, एक तरुण थोडक्यात बचावला

रत्नागिरी:- शहरातील मांडवी भुते नाका येथे स्थानिक तरुणाने दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या गंभीर हल्ल्यात अरमान इनामदार हा गंभीर जखमी झाले असून, त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरमान इनामदार हा दुचाकीवरून जात असताना, अंकुश मांडवकर नावाच्या तरुणाने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार केले. हे वार अरमान यांच्या डाव्या गालावर आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस करण्यात आले, ज्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेतील इनामदार याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरमान इनामदार यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. शहर पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेत, हल्ला करणाऱ्या मांडवकर नावाच्या व्यक्तीला त्वरित ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.