चिपळूण:- तालुक्यातील मांडकी-घाणेकरवाडी येथे बंद घर फोडून रोख रक्कम ५० हजार लांबवली असल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमाकांत राजाराम सुर्वे (वय 71, मांडकी-घाणेकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 17 एप्रिल ते 4 मे या कालावधीत सुर्वे यांचं घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील पडवीच्या दरवाजाचे कुलूप लोखंडी शिगेने तोडले. तसेच किचनचे लोखंडी ग्रील उचकटून वाकवून त्याद्वारे चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूमच्या दरवाजाचे कुलूप कापून त्याने कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली 50 हजारांची रोख रक्कम लांबवली. हा प्रकार सुर्वे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गमरे करीत आहेत.









