महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद भिकू मुदगल (३८, रा. आसावे कुणबीवाडी, ता. संगमेश्वर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मे २०२२ मध्ये घडली होती.

या प्रकरणाचा निकाल रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी दिला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी कामकाज पाहिले.

सरकारी वकिलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आसावे येथील रहिवासी साधना सुधाकर मुळये (५५) व आरोपी विनोद मुदगल यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. १४ मे २०२२ रोजी दुपारी सुमारे १ वाजता विनोद हा तक्रारदार राहत असलेल्या घरी आला. त्या वेळी साधना मुळये या घरात एकट्याच होत्या. आरोपीने अचानक त्यांच्यासमोर उभे राहून वाद घातला. “तू इथे का आलास, तुला इथे काय काम आहे?” असे विचारल्याचा राग आल्याने आरोपीने तक्रारदार यांचा अचानक गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जोरात गळा आवळल्याने त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले व त्या जागीच बेशुद्ध पडल्या. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांना गळ्याला तीव्र वेदना होत असून मानेवर गळा आवळल्याच्या खुणा व नखांचे ओरखडे दिसून आले.

या घटनेबाबत साधना मुळये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे व साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.