रत्नागिरी:- फॅन दुरुस्तीच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३० मे २०१९ रोजी दुपारी १ वा.सुमारास सन्मित्र नगर येथे घडली होती.
जितेंद्र चंद्रकांत बाईत (रा.जे.के.कॉलनी मिरजोळे, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,३० मे २०१९ रोजी दुपारी पिडीता खानावळ लोकांचे डबे भरत असताना आरोपी त्यांच्या घरी फॅन दुरुस्तीसाठी आला होता.तेव्हा पिडीतेने त्याला माझे पती घरात नसल्यामुळे तुम्ही फॅन दुरुस्त करु नका असे सांगितले.तेव्हा आरोपीने पिडितेच्या पाठीमागून येउन तिचे दोन्ही पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला होता.
याप्रकरणी पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी जितेंद्र विरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करुन शहर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिलेले आहे. तसेच सरकारी पक्षातर्फे अॅड.गोताड यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून या खटल्याचा बुधवारी निकाल देताना प्रथम न्यायदंडाधिकारी रोषनी यादव यांनी आरोपीला २ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड तो न भरल्यास २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.दंड स्वरुपातील ५ हजार रुपयांची रक्कम पिडीतेला देण्यात येणार आहे









