महा आवास अभियान अंतर्गत जिल्ह्यात उभी राहणार 3 हजार घरे

रत्नागिरी:- ग्रामीण गृहनिर्माण योजना गतिमान करण्यासाठी महा आवास अभियान (ग्रामीण) 20 नोव्हेंबर 2020 ते  28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात 8 लाख तर रत्नागिरी जिल्ह्यात 3 हजार 318 घरकुलं बांधायचे लक्ष निश्‍चित केले आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवा अशा सूचना विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजित महा आवास अभियान ग्रामीण विभागिय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून निवासी उपजिल्हधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, सहाय्यक संचालक समाजकल्याण श्री. चिकणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष गमरे उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. मिसाळ म्हणाले की, उत्तम गुणवत्तेचे घरकुल उभारण्यासाठी प्रशिक्षीत गंवडी आवश्यक आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले पाहीजे. घरकुलाचे डेमो हाऊस पंचायत समिती आवार किंवा रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी, वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी करा. विविध योजनांमधील प्रलंबित कामांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घ्यावा. या योजनेत सामाजिक संस्थाचा सहभाग घ्यावा. अपूर्ण घरकुलांचा वेगळा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी. घरकुलांना मंजूरी, मंजूर घरांना पहिला हप्ता, घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल पूर्ण करणे, ग्रामीण गंवडी प्रशिक्षण, डेमो हाऊस उभारणे, आधारसिडींग पूर्ण करणे आदी कामे विहित मुदतीत पूर्ण करा.