राजापूर:- तालुक्यातील ओणी येथे वायरमनला शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महावितरणच्या कनिष्ठ अभियंता ज्योती नवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ओणी येथील 8 जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला शाखा अभियंता ज्योती नवाळे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन राजापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये राजू पवार, संतोष रायकर, सूर्यकांत सुतार, संजय लिंगायत, नीलेश खातू, सतीश पवार, सोनाली रायकर यांच्यासह अन्य एका अज्ञाताचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता ज्योती नवाळे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि.२७ मार्च रोजी महावितरणचे कर्मचारी वायरमन प्रकाश बाबू गमरे यांचा ओणी पेट्रोलपंपासमोरील रोड पलिकडे असलेल्या डी.पी.वरती शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अभियंता श्रीम.नवाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत आपल्या वरिष्ठांसह राजापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. प्रकाश गमरे ज्या डीपीवर शॉक लागून चिकटले होते, त्या डीपीच्या खालील बाजूस जमिनीवरून धूर येत असल्याने ओणी फिडरचा वीज पुरवठा चालू आहे का? ते तपासण्यासाठी त्या महावितरण उपकेंद्र ओणी येथे गेल्या. दरम्यान श्रीम.नवाळे उपकेंद्रावर असताना सुमारे ३५ ते ४० लोकांचा जमाव त्या ठिकाणी आला व तिकडे तुमचा माणूस लटकला आहे व तुम्ही इथे काय करता? असा सवाल करत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे नवाळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.
त्या ठिकाणी लोकांची समजूत काढून त्या पुन्हा घटनास्थळी पुढील कार्यवाहीसाठी गेल्या असता उपकेंद्रात जमा झालेले लोकही त्याठिकाणी आले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी घेराव घातला पुन्हा जाब विचारायला सुरूवात केली. आम्ही सांगतो तसाच जबाब पोलिसांना द्यायचा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी तेथे असलेले महावितरणचे अधिकारी सौ.नेहा आखाडे, संदीप बंडगर, योगेश ठाकरे आदी उपस्थित होते.
दरम्यान राजापूर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी त्या ठिकाणी आले व ते आम्हाला घोळक्यातून बाहेर नेत असताना तेथे जमलेल्यांपैकी संतोष रायकर, राजू पवार, सुर्यकांत सुतार, संजय लिंगायत, निलेश खातू, सतीश पवार, सोनाली रायकर व अन्य एकाने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच कनिष्ठ अभियंता योगेश ठाकरे, श्री.बंडगर यांना मारहाण केली. तर नेहा आखाडे व आपणाला सोनाली रायकर हिने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.