रत्नागिरी:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतीपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी सर्व अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
यावर्षी जूनपासून राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट नोंदवण्यात आली असून, राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध दुष्काळी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महावितरणनेही आपली तांत्रिक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी विविध परिमंडलांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कृषिपंपांसह सर्व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे, वीजयंत्रणेची पाहणी आणि उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या.
महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतीसह इतर सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाचा असलेला वीजपुरवठा सुरळीत राहील, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेचा वापर करून अथवा तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना आहेत.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचनाही महावितरणने दिल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची तांत्रिक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.









