महामार्ग चौपदरीकरणाच्या साहित्याची चोरी करणारे दोघेजण ताब्यात

चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गावर सुरु असलेल्या चौपदरीकरणाचे कामानिमित्त ठेवण्यात आलेले लोखंडी साहित्य चोरणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. अंकुश अनंत गमरे (39, बामणोली, बौध्दवाडी, चिपळूण), राजन विनायक पावसकर (51, मोरवणे फाटा, चिपळूण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जयंतीलाल घेवरचंद नानेचा (52, व्यवसाय नोकरी कामथे तांबटवाडी, चेतक कंपनी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चिपळूण पाग पॉवर हाऊस नाका येथे मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरणासाठीचे साहित्य ठेवण्यात आले होते. ब्रीजच्या बाजूला असलेल्या लोखंडी सळ्या अंकुश गमरे, राजन पावसकर हे दोघेही ऍपे रिक्षा (एमएच 08, के 6270) मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भादविकलम 379, 511, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.