खेड:- उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी २५ जानेवारी रोजी गेलेले खेडचे तिघेजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन आर. चव्हाण (२२), सिद्धांत राठोड, गिरीजाबाई (४८) अशी बेपत्तांची नावे आहेत. सुभाष राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रयागराज-उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. त्या तिघांचाही अद्याप कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. या बाबत प्रयागराज पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साथत शोध घेण्याबाबत कळवले आहे.
प्रयागराज येथील जाणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने कोकणमार्गे उड्डपी-टुंडला स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या होत्या. या स्पेशलमधून कोकणातील अनेक भाविक कुंभमेळ्यासाठी गेले होते. तर काही भाविकांनी खासगी वाहनांने दूरवरचा प्रवास करत प्रयागराज गाठले होते. तालुक्यातूनही अनेक भाविकांनी महाकुंभमेळ्यासाठी हजेरी लावली होती. प्रचंड गर्दीतही प्रयागराज येथे शाहीस्नान केल्यानंतर भाविक माघारी परतले होते.
सचिन चव्हाण, सिद्धांत राठोड, गिरीजाबाई हे तिघेही कुटुंबियांसमवेत प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. मात्र महाकुंभमेळा आटपूनही या तिघांचा कुटुंबियांशी संपर्कच झालेला नाही. अखेर कुटुंबियांनी प्रयागराज पोलीस ठाणे गाठत तिघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
प्रयागराज पोलिसांनीही तिघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सुगावा लागलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. हे तिघेजण खेड तालुक्यातील रहिवासी असल्याने प्रयागराज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार यादव यांनी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क साधत बेपत्ता असलेले तिघेजण मूळ गावी आले आहेत का, याची खातरजमा करण्याबाबत कळवले आहे. या तिघांच्या अपुऱ्या पत्त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान येथील पोलिसांसमोर आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध माहितीनुसार, तिघांचाही पोलीस पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता असलेल्या तिघांबाबत कोणाला काही माहिती असल्यास येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.