मनरेगा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंधरा सिंचन विहिरी बांधणार

रत्नागिरी:- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंंतर्गत (मनरेगा) कोकणातील प्रत्येक ग्रामपंचायतीत 15 सिंचन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सिंचन प्रकल्पावर अवलंबून न राहता वैयक्तिक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकर्‍यांकडे असावे आणि सिंचनाच्या बाबतीत शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी ही योजना मनरेगातही प्रस्तावितच करण्यात आली आहे.

या योजनेत ऑनलाईन नोंदणी करता येत असल्याने शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फ करण्यात आले आहे. योजनेंंतर्गत शेततळे, विहिरींसाठी ‘मनरेगा’तून अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या विहिरींकरिता पूर्वी नोंदणी कागदोपत्री करावी लागत होती. मात्र सिंचन विहिरींसाठी आता मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आला असून सुलभरित्या नोंदणी ऑनलाईन करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत 15 विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात योजनेंतर्गत पाच हजार विहिरी चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी 100 दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्य स्तरावर देण्यात येणार आहे.
या योजनेमुळे खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणारा आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणार्‍या शेती बरोबरच उन्हाळ्यातही सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे.