मद्यधुंद पतीने बायकोच्या डोक्यात घातला फावडा

दापोली:- दापोली तालुक्यातील शिरखल, गाववाडी येथे दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावडा घातल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पत्नी संजीवनी शिंदे (45, शिरखल, गाववाडी) यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संजय विष्णू शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा पती नेहमी अति दारु पिऊन कारण नसताना त्रास देतो. 3 जुलै रोजी सायंकाळी 6.60 वा. संजीवनी या जेवण बनवत असताना दारु पिऊन आलेल्या त्यांच्या पतीने हातातील फावडा त्यांच्या डोक्यात मागील बाजूने मारुन दुखापत केली. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस स्थानकात दिल्यानंतर पती संजय शिंदे याच्याविरोधात भादविकलम 324, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.