मत्स्योत्पादनात मिरकरवाडा बंदर ठरले नंबर वन

रत्नागिरी:-मासळी उतरवण्याच्या क्रमवारीत  गेल्या पंचवीस वर्षांपासून मिरकरवाडा बंदराने अव्वल क्रमांक राखला आहे. दरवर्षी या बंदरावर इतर सर्व बंदरांपेक्षा अधिक मासळी मच्छीमार नौकांमधून उतरवली जाते.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीवर 3 हजार 519 यांत्रिकी नौका, तर 442 बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करतात. समुद्रातून आणलेली मासळी उतरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 43 लँडिंग सेंटर आहेत. झोननुसार मासे उतरवण्याच्या केंद्रांची वर्गवारी करण्यात आली असून, आतापर्यंत मिरकरवाडा बंदर सरस ठरले आहे. पर्ससीन, मिनी पर्ससीननेट मासेमारीवर कालावधी, समुद्रक्षेत्राच्या  मर्यादा आल्या असल्या तरी समुद्रातील मासळीचे उत्पादन मिरकरवाडा बंदरावर उतरवण्याच्या प्रमाणात काही फरक पडलेला नाही.

मिरकरवाडा बंदरात प्रामुख्याने पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौकांमधील मासळी उतरवली जाते. त्याचबरोबर या बंदरावर देशातील अनेक राज्यांमध्ये मासळी पाठवण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर मासळी निर्यात करणार्‍या पाच कंपन्यांही असल्याने येथील मासळीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.

मिरकरवाडा बंदरात सन 1995-96 साली 10 हजार 80 टन मासळी उतरवण्यात आल्याची नोंद आहे. सन 2020-21 मध्ये हेच प्रमाण 30 हजार 829 टन इतके आहे. या गेल्या पंचवीस वर्षांत मिरकरवाडा बंदराने मासळी उतरवण्याच्या क्रमवारीत पहिला क्रमांक कायम राखला आहे. मासेमारी करणार्‍या नौकांची संख्या गेल्या पंचवीस वर्षांत वाढत गेली असली, तरी मासळी उत्पादन बंदरावर उतरवण्याच्या प्रमाणात काही फरक पडलेला नाही.

मिरकरवाडा बंदरात 2003-04 साली तब्बल 60 हजार 409 टन मासळी उतरवली गेली. सन 2013-14 मध्ये 51 हजार 609 टन मासळी उतरली गेली. त्यानंतर पर्ससीननेट मासेमारी चार महिन्यांवर आल्यानंतर सन 2020-21 मध्ये या बंदरावरील मासळी उतरवण्याचे प्रमाण 30 हजार 829 टनावर आले. पाच वर्षांपूर्वी पर्ससीननेट मासेमारी सप्टेंबर ते मे महिन्यापर्यंत अशी आठ महिने चालायची. त्यावेळी मासळी उतरवण्याचे प्रमाण फारच मोठे होते. 2014-15 मध्ये हेच मासळी उतरवण्याचे प्रमाण 74 हजार 234 टन इतके होते.

मासळी उतरवण्याच्या बंदरातील बुरोंडी, दाभोळ, रत्नागिरी हे झोन आहेत. रत्नागिरी झोनमध्ये जयगड, मिर्‍याबंदर, काळबादेवी, साखरतर आदी बंदरे येतात. मिरकरवाडा हा स्वतंत्र झोन असून हे  सर्वात मोठे आणि प्रमुख बंदर आहे. बुरोंडी झोनमधील बंदरांमध्ये मासळी उतरवण्याचे प्रमाण सर्वांत कमी आहे. सन 2020-21 मध्ये 8 हजार 959 टन इतकी मासळी बुरोंडी बंदरावर उतरली गेली आहे.