मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये महिलेची पर्स चोरीला; तीन लाखांचा ऐवज लंपास

खेड:- खेड रेल्वे स्थानक परिसरातून जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रत्नागिरीहून खेड रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास करत होत्या. बोगी क्रमांक ५३ मधील सीट नंबर ६० वर त्या झोपलेल्या असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेतला. चोरट्याने त्यांची हँडबॅग लंपास केली आणि त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेतली. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्याने ती हँडबॅग शौचालयात टाकून दिली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये मोठी किंमत असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. यात अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे लक्ष्मीचे पेंडल असलेले आणि दोन पोवळे व सोन्याच्या मणीत सोन्याच्या तारीत गुंफलेले सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे ०७ ग्रॅम वजनाची कडीची डिझाइन असलेली सोन्याची गळ्यातील चेन, अंदाजे ०१२ ग्रॅम वजनाचे चपटी पट्ट्यांचे डिझाइन असलेले सोन्याचे ब्रेसलेट, अंदाजे ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची जेन्टस अंगठी आणि २०००/-रुपये रोख असा एकूण २,८९,४१०/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.