मडगावकडे जाणाऱ्या कोकणकन्या गाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळित 

रत्नागिरी:- मडगाव ते मुंबई धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस कोकिसरे ते वैभववाडी रेल्वेस्टेशन दरम्यान बंद पडली. त्यामुळे या मार्गावरील सकाळ सत्रातील वाहतुकीवर थोडा परिणाम झाला. एक तास गाडी रेल्वेमार्गावर उभी होती. हा प्रकार सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

रत्नागिरी स्थानकातून सव्वासहा वाजता कोकणकन्या एक्स्प्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली. सध्या बहुसंख्य गाड्या या विजेवर चालवल्या जात आहेत. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. कोकिसरे रेल्वेफाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही गाडी बंद पडली होती. हा एकदिशा मार्ग असल्यामुळे या मार्गावरील अन्य गाड्या आजूबाजूच्या रेल्वेस्थानकात थांबवण्यात आल्या. गाडी पुढे नेण्यासाठी राजापूर स्थानकावरून नवीन इंजिन मागवण्यात आले. ते घटनास्थळी पोचेपर्यंत एक तासाहून अधिक काळ लागला. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. या प्रकारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस सुमारे एक तासाहून अधिक काळ उशिराने धावत होती. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची गैरसाय झाली होती. सध्या पर्यटन हंगाम नसला तरीही मुंबईतून मडगावकडे जाणार्‍या पर्यटकांची संख्या तेवढीच अधिक आहे. कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा या गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. कोकणकन्या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. ही गाडी बंद पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.