रत्नागिरी:-एक आठवड्याच्या आत सलग दुसर्यांदा पोलिसांनी रत्नागिरी शहरात अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे. यावेळी तर एका पोलीस कर्मचार्याने वेशांतर करून धाड टाकली आणि ८० ग्रॅम चरस घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. या कारवाईत एका हिस्ट्रीशिटरला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी मच्छिमार्केट परिसरात केली.
रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होत असून शहरवासीयांनी वारंवार तक्रारी देऊनदेखील विक्री विरोधात ठोस कारवाई झाली नव्हती. त्यातच अंमली पदार्थ विकणार्यांनी ‘चोरी-चोरी, छुपके-छुपके’ चा मामला सुरू केल्यानंतर संशयितांपर्यंत पोहोचणे अवघड झाले होते. मात्र पोलिसांनी आपले नेटवर्क वापरून या तस्करांचे कंबरडेच मोडण्याचा विडा उचलला आहे.
नुकतीच मच्छिमार्केट परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली. या ठिकाणीदेखील पोलिसांनी एका संशयितांकडून चरस हस्तगत केले. शहरात चरसची विक्री होत असल्याचे या कारवाईतून उघडकीस आले होते.
अंमली पदार्थांच्या तस्करीसह अंमली पदार्थ विक्री करणार्यांचे मोठे नेटवर्क आहे. या नेटवर्कपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले आहे. मात्र मोठे मासे अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. या नेटवर्कचे जाळे कुठपर्यंत पोहोचलेय, याची पाळेमुळे रत्नागिरी शहरात कुठे कुठे रुजली आहेत याची जंत्रीच पोलिसांनी बाहेर काढली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहर पोलीस स्थानकातील पोलीस नाईक राहुल घोरपडे हे डॉक्टरकडे जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी मच्छिमार्केट परिसरातील एका इमारतीत चरसची विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून त्या परिसरात कारवाई करण्याचा निर्णय घोरपडे यांनी घेतला. त्याची सूचना त्यांनी प्रभारी शहर पोलीस निरीक्षकांना दिली होती. कारवाई करण्याचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर घोरपडे यांनी वेशांतर केले आणि त्यानंतर ते कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले.
वेशांतर केलेल्या घोरपडे यांनी संशयिताला पोलीस असल्याची कल्पना येऊ नये म्हणून त्यांनी एका हातात अंड्याचे ट्रे तर दुसर्या हातात भाजीची पिशवी घेतली होती. डोक्यात गोल टोपी घातली होती. त्यामुळे त्यांना ओळखणे मुश्किल झाले.
ज्या ठिकाणी चरसची विक्री होत होती त्या ठिकाणी घोरपडे यांनी धाड टाकली व त्या ठिकाणी शहर पोलीस स्थानकात हिस्ट्रिशिटर असलेल्या सलमान डांगे नामक संशयिताला जेरबंद केले. त्याच्याकडून ८० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे.
या कारवाईनंतर घोरपडे यांनी शहर पोलीस स्थानकाच्या डीबी स्क्वॉडला माहिती दिली. या माहितीवरून डीबी स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. संशयिताला या पथकाच्या ताब्यात दिल्यानंतर पुढील कारवाई डीबी पथकाने सुरू केली आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी सलमान डांगे नामक तरूणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनंतर पोलिसांनी पुढील तपासाची सुत्रे वेगाने फिरवली असून अंमली पदार्थ तस्करांसह विक्री करणार्या संशयितांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पोलीस पुढे सरसावले आहेत.