रत्नागिरी:- ऑगस्टपासून सुरु होणार्या मच्छीमारी हंगामावर कोरोनाच्या टाळेबंदीचे सावट कायम आहे. मच्छिमारी नौकांवरील बहूतांश खलाशी केरळ, कर्नाटकसह नेपाळी असल्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्यात कसे आणायचा हाच मोठा प्रश्न मच्छीमारांपुढे निर्माण झाला आहे. मोठ्याप्रमाणात खलाशी येणार असल्याने त्यांचे पासेस मिळवणे आणि त्यांना क्वारंटाईन करणे या दोन बाबींवर निर्णय घ्यावे लागणार आहे.
मच्छीमारी बंदी 1 ऑगस्टपासून संपुष्टात येत आहे. त्यासाठी अजून दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळलेला असून मासेमारीसाठी पोषक स्थिती राहीलच असे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मासेमारी नारळीपौर्णिमेनंतरच सुरु होईल असे अंदाज आहे. गेल्या हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनामुळे मासेमारी थांबलेली होती. मासेमारी सुरु झाल्यानंतरही पकडलेली मासळीची विक्री कशी करायची असा प्रश्न होता. त्यावर मात करताना तारांबळ उडाली होती. कोरोनातील टाळेबंदीतच हंगाम संपुष्टात आला. त्यामध्ये लाखो रुपयांचा फटका मच्छीमारांना बसला होता. यंदाही हंगामाच्या सुरवातीलाच कोरोनाचे सावट निर्माण झालेले आहे. मे महिन्याच्या अखेरीस खलाशांना परराज्यातील घरी पाठविताना मच्छीमारांना कसरत करावी लागली.
आता हंगामाच्या सुरवातीलाच खलाशांचा प्रश्न मच्छीमारांपुढे निर्माण झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हजारो परप्रांतीय खलाशी कार्यरत असतात. मात्र या सर्व खलाशांना मच्छीमारीसाठी पुन्हा रत्नागिरीत कसे आणायचे असा प्रश्न जिल्ह्यातील मच्छीमारांना पडला आहे. गेल्या वर्षभरापासून मच्छीमारी व्यवसाय बंद आहे. केवळ मे महिन्यातच मच्छीमारी करता आली. पुन्हा जून महिन्यापासून मच्छीमारी बंद करण्यात आली आहे. पर्ससिन मच्छिमारी बोटींसह जिल्ह्यात हजारो नौका आहेत. यावर हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. खलाशी नसतील तर या सर्व नौकां बंदी कालावधी संपला तरीही बंदरातच उभ्या करुन ठेवाव्या लागणार आहेत.









