वातावरण देखील शांत; नौकांना बांगड्याचा आधार
रत्नागिरी:- बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम मच्छीमारी व्यावसायावर झालेला होता; मात्र गेल्या आठवड्यात परिस्थिती सुधारु लागली असून बहूतांश मच्छीमारांना बांगड्याचा आधार मिळाला आहे. छोट्या मच्छीमारांसह पसर्सिननेटलाही बांगडा मिळत असल्याने विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरावण्यास मदत होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नोव्हेंबर महिना वादळी स्थितीचा होता. समुद्र खवळल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मच्छीमारांना बंदरातच उभे रहावे लागले होते. मासळीही कमी प्रमाणात मिळत होती. त्यामुळे मच्छीमारांची अवस्था बिकट होती. मागील आठ दिवसांमध्ये परिस्थिती सुधारत आहे. गतवर्षी उत्पादन कमी झालेला बांगडा यंदा काहीप्रमाणात मिळू लागला आहे. छोट्या गिलनेटने मासेमारी करणार्यांना 5 ते 10 हजार रुपयांची तर मोठ्या नौकांना 50 ते 60 हजार रुपयांची मासळी मिळत आहे. हा बांगडा खाण्यासाठी वापरला जात असून काही मासा निर्यातीसाठी पाठवला जात आहे. बांगड्याचा किलोचा दर 80 ते 120 रुपयांपर्यंत आहे. त्याबरोबरच वाशी, पेढी, सुरमई हे मासे मिळत आहेत. सुरमईचा दर किलोला 350 ते 400 रुपयांपर्यत मिळतो. यंदा सुरवातीपासूनच सुरमईचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे खवय्यांना चढ्या दराने हा मासा खरेदी करावा लागत आहे. गेले आठवडा बांगडा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने हा महिना सुखद जाईल असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, थंडीचा जोर वाढत असल्यामुळे जेलीफिश आणि डॉल्फिन या दोन्हीचा त्रास समुद्रात मासेमारी करताना सहन करावा लागत आहे. काही मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले आहे. मिर्यापासून दहा वावात 50 डॉल्फिनची झुंड मच्छीमारांच्या नौकांच्या बरोबरीने पुढे सरकत होती. ते एकाचवेळी जाळ्यात येतील या भितीने मच्छीमारांनी तिथून बाजूला सरकणे पसंत केले. गेले दोन ते तीन दिवस मतलई वारे वाहू लागल्याने थंडी सुरु झाली आहे. त्यामुळे जेलीफिश आणि डॉल्फिन किनारी भागात वास्तव्य करुन राहतील असा अंदाज आहे.









