मंडणगड येथे वृध्द महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

मंडणगड:- सडे-बौद्धवाडी येथील एका ७६ वर्षीय वृध्द महिलेस मारहाण झाल्याच्या घटनेबाबत मंडणगड पोलीस स्थानकात शनिवारी गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भात माराहण झालेली वृद्ध महिला सकवारबाई सखाराम येलगावर यांनी फिर्याद दाखल केली.

माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास बाम्हणाच्या टेपा येथील त्यांच्या मालकीच्या जागेत – काजुच्या बिया काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गावातील नामदेव बाबाजी म्हसकर (सडे गावठाण) त्यांच्यामागून तेथे आले व त्यांच्याशी विनाकारण भांडण करु लागले. तसेच येलगावकर यांना शिवीगाळ करुन त्यांना ठार मारण्याची धमकी देवून आपल्या हातातील काठीने त्यांच्या डोक्यात व पाठीवर मारुन दुखापत केली. त्यानुसार मंडणगड पोलिसात नामदेव म्हसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या बाबत पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.