भोस्ते येथे तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल

खेडः– तालुक्यातील भोस्ते रेल्वे ब्रिजजवळील पाटीलवाडी परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज सुरेश पाटील (१९, व्यवसाय-शिक्षण, रा. भोस्ते पाटीलवाडी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या भावासोबत गणेशोत्सवासाठी पत्रावळी घेऊन येत असताना टी पॉईंटजवळ थांबले, त्याचवेळी आरोपी संदेश संतोष पाटील याने आपल्या ताब्यातील बलेनो कार (क्र. यूपी ३२ एलई ४५९४) भरधाव वेगात आणून वाहनाला धडक फिर्यादींच्या दिली. याबाबत जाब विचारल्यावर संदेश पाटील याने फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर त्याने साथीदारांना बोलावून आणले. आरोपी राकेश भाऊ पाटील, अनिल भाऊ पाटील, सुधीर बबन दळवी, अमित सुनिल सावंत, सिद्धांत सुनिल मोहिते, ऋषीकेश रमेश लाड, विलास केशव भुवड, नितेश वामन पाटील, संतोष रावजी पाटील आणि निलेश पांडुरंग खापर यांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ केली व हातातील बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून दुखापत केली. तसेच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.