‘भोम’ सहकारी संस्थेत १७ लाखांचा अपहार

लेखा परीक्षणात उघड; संस्थेच्या तत्कालीन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील भोम विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तब्बल १७ लाख ७५ हजार ३७५ रुपये २० पैसे इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करत असताना हा प्रकार निदर्शनास आला असून, याप्रकरणी संस्थेचा तत्कालीन कर्मचारी योगेश प्रमोद भोचेकर (रा. मालदोली, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी वैभव रामचंद्र ठसाठे (वय ४२, रा. चिपळूण) हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सन २०२३-२०२४ या वर्षाचे भोम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण केले. या तपासणीदरम्यान, संस्थेचा तत्कालीन कर्मचारी योगेश प्रमोद भोचेकर याने संस्थेच्या व्यवहारांची चुकीची माहिती संचालक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू न देता अपहार केल्याचे आढळून आले.

लेखापरीक्षणात भोचेकरने एकूण १७ लाख ७५ हजार ३७५ रुपये २० पैसे इतक्या रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती मिळताच संस्थेचे लेखा परीक्षक वैभव ठसाठे यांनी भोम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, भोमचे वैधानिक लेखा परीक्षक या नात्याने चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी योगेश प्रमोद भोचेकर याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.

चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सहकारी संस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.