रत्नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरासह झाडगाव येथील जोगेश्वर मंदिर आणि तांबट आळी येथील नवलाई पावणाई मंदिरात भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश देण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी हनुमान जयंती म्हणजेच शनिवार दि. 12 एप्रिलपासून करण्यात आली आहे.
श्री देव भैरीवर बारावाड्यातील ग्रामस्थांसह राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नित्यनेमाने दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच दूरदूरचे भाविकही दर्शनाला येतात. देवस्थानतर्फे वर्षभर विविध उत्सव आणि सणही साजरे केले जातात. मंदिरात पावित्र्य राखले जावे यासाठी हुनमान जयंतीपासून मंदिर प्रवेशासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
असभ्य व अशोभनीय, तोकडी व फाटलेली जीन्स अशा प्रकारचे कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये. भाविकांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे सात्विक वेशभूषा करुनच मंदिरात प्रवेश करावा, संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, मंदिराच्या सात्विकतेचे रक्षण करणे हे धर्मकर्तव्यच आहे, अशा सूचना करणारा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांना आपल्या वेशभुषेची माहिती असल्याने ते पारंपरिक वेशभुषेत दर्शनासाठी येतात. मात्र परजिल्ह्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांना याची माहिती नसल्याने महानगरातील नेहमीच्या राहणीमानातील कपडे घालून मंदिरात प्रवेश करतात. ही गोष्ट श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टींच्या लक्षात आल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘ड्रेस कोड’ लागू केला असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे यांनी सांगितले.