खेड: भेलसई ते खेर्डी प्रवासादरम्यान रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने ती मोरीवरील पुलाच्या सिमेंट कठड्यावर जोरदार आदळून झालेल्या भीषण अपघातात एका २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी झालेले हर्षद संजय तांबे (वय २१, व्यवसाय नोकरी, रा. भेलसई, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात मयत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही अपघाताची घटना दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास भेलसई, खांबेवाडी येथील वळणावर घडली असून, याबाबत दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२८ वाजता पोलिसांत अधिकृत नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी हर्षद तांबे आणि मयत आरोपी चालक रविंद्र भागुराम तांबे (वय २६, रा. भेलसई बौद्धवाडी, ता. खेड) हे दोघेजण होंडा शाईन दुचाकीवरून (क्र. एम.एच. ०८ ए.डब्ल्यु ६५६१) भेलसई ते खेर्डी असा प्रवास करत होते. त्यांची दुचाकी भेलसई खांबेवाडी येथील वळणावर आली असता, चालक रविंद्र याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली ही दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीवरून जाऊन थेट मोरीवरील पुलाच्या सिमेंट कठड्यावर जोरदार आपटली.
या भीषण धडकेत चालक रविंद्र तांबे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी हर्षद तांबे याच्या डाव्या हाताच्या मनगटावर व डोक्याला दुखापत होऊन दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातास आणि स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खेड पोलिसांनी मयत चालक रविंद्र भागुराम तांबे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि ३ (१)/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.









