भाड्याने दिलेली कार परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- भाड्याने दिलेली स्विफ्ट कार मालकाला परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर येथील रेमंड शॉपीच्या बाजूला घडली. याप्रकरणी समीर पुंडलिक सुतार (३०, सध्या रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर सुतार यांनी त्यांची लाल रंगाची स्विफ्ट व्हीएक्सआय कार ( MH ०२ BY ९८०८) संशयित आरोपी निलेश रवींद्र फरांदे (रा. आणेवाडी, जि. सातारा) याला भाड्याने दिली होती. मुदत संपल्यानंतर सुतार यांनी फरांदे याच्याकडे वारंवार गाडीची मागणी केली, परंतु त्याने गाडी परत केली नाही.

त्यानंतर आरोपी गणेश मारणे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कोथरूड, पुणे) याने सुतार यांना फोन करून त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे सांगितले आणि ती दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकल्याचे नमूद केले. त्याने सुतार यांना गाडीचे फोटोही पाठवले आणि दोन दिवसात गाडी परत देतो, असे आश्वासन दिले. मात्र, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी संगनमत करून सुतार यांना त्यांची कार परत केली नाही.

याउलट, गणेश मारणे याने सुतार यांना धमकी दिली की, जर त्यांनी पोलिसात तक्रार केली तर त्याचे बरे होणार नाही. या फसवणुकीमुळे आणि धमकीमुळे समीर सुतार यांनी अखेर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी निलेश फरांदे आणि गणेश मारणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(१), ३११(४) आणि ३०७(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.