भाट्ये येथे दोन कारमध्ये अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये येथील रस्त्यावर दोन मोटारीत झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ कुमार खेत्री (वय २२, रा. खडपेवठार, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास भाट्ये येथील आनंद हॉटेल समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्रसन्न गजानन दामले हे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ९६०२) घेऊन भाट्ये रस्त्यावरुन आनंद हॉटेल येथे आले असता डाव्या बाजूच्या आतील भाट्ये टेबल पॉईंट कडून कच्चा रस्त्यावरुन येणारी दुसरी मोटर (क्र. एमएच-०८ झेड ६८६९) वरिल संशयित चालकाने निष्काळजीपणे मोटार चालवून दामले यांच्या मोटारीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.