नगरसेवक अमित विलणकर यांची मागणी
रत्नागिरी:- शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील भाट्ये येथील जुन्या पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, या पुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग सातत्याने कोसळत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीकडे नगरसेवक अमित विलणकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हा पूल अनेक वर्षांपासून वापरात असला तरी गेल्या काही काळापासून तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच पुलाचा एक तुकडा निखळून पडल्याने एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर आज पुन्हा पुलाची साईड पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने, यावेळी जवळच असलेली लहान मुले यातून थोडक्यात बचावली, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. पुलाची ही ढासळती स्थिती आणि वारंवार होणाऱ्या या पडझडीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असल्याचे अमित विलणकर यांनी नमुद केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी आणि तांत्रिक तपासणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी अमित विलणकर यांनी प्रभागातील समस्त नागरिकांच्या वतीने केली आहे.









