भाट्ये खाडीतील गाळ काढण्यासाठी लवकरच निधी मिळणार

रत्नागिरी:- तालुक्यातील राजीवडा-भाट्ये खाडी मुखातील गाळ उपसण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय कार्यवाही पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर्ण करत आणली आहे. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारा सुमारे 60 ते 70 कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

राजीवडा-भाट्ये खाडी मुखाजवळ गाळ साचण्याचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांच्या नौका मासेमारीसाठी समुद्रात नेताना आणि मासेमारी करून जेटीवर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मच्छिमार नौकांचे नुकसानही होत असते. यासंदर्भात राजीवडा-भाट्येसह आजूबाजूच्या समुद्र किनारी राहणार्‍या नौका मालकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी अनेकवेळा बैठका घेवून चर्चा केली. सुमारे 20 वर्षांपासूनची ही समस्या आता सुटण्याच्या मार्गावर आहे.

पालकमंत्री उदय सामंत आमदार झाल्यापासून या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने शासन स्तरावर अडचणी निर्माण होत होत्या. मात्र मच्छिमार नाराज होत होते. प्रजासत्तादिनी याच मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णयही मच्छिमारांकडून घेण्यात आला. त्यासंदर्भात बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत या गाळ काढण्याच्या कामाला दिवाळीनंतर सुरूवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. या कामासाठी लागणारा 60 ते 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आंदोलन होणार की मच्छिमारांकडून वाट पाहिली जाणार याकडे लक्ष लागले आहे.