पर्यटन वाढीस उपयुक्त; अनुषंगिक प्रयत्नांची गरज
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात डॉल्फिन या पर्यटकांचे विशेष आकर्षण असलल्या समुद्री माशाचा वावर दिसत आहे. जयगड नंतर आता भाटये समुद्रातही डॉल्फिनचा मोठा कळप समुद्रात मुक्त विहार करताना दिसत आहे. पर्यटकांना ही नवी पर्वणी असून छायाचित्रकारांसाठीही ही पर्वणी ठरत आहे.
दापोलीमध्ये डॉल्फिनचे दर्शन घडावे, यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र सफर करतात आणि लांबूनच डॉल्फिनच्या समुद्री कसरती पाहण्याचा आनंद घेतात. दापोली पाठोपाट जयगड आणि आता भाट्ये समुद्रातही मोठ्या प्रमाणात डॉल्फिन माशाचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. शहराजवळील भाट्ये समुद्रात डॉल्फिनचा झुंड दिसून आला. या झुंडीचा ड्रोन शॉट रत्नागिरीत मिळाला आहे. राज्याला लाभलेल्या ७२० किमी समुद्र किनाऱ्यापैकी जिल्ह्याला १८० किमी समुद्र किनारा लाभला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जैववैविधता आहे. डॉल्फिनबरोबर विविध प्रकारचे जेलिफिशन व अन्य वनस्पती आढळुन येतात. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर डॉल्फिनला असुरक्षित वाटेल असे काही नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगद मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचा वावर दिसत आहे. पर्यटकांना ही एक पर्वणी असून पर्यटन वाढीला याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र त्यानुषंगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील छायाचित्रकार सुप्रियांतो खवळे यांनी डॉल्फिनच्या झुंडीचा हा ड्रोन शॉट घेतला आहे.