भाटकरवाडा येथील दुचाकी जाळपोळ प्रकरणात फिर्यादीच ठरला आरोपी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या मागे दोन समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा हेतू होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानंतर खुद्द पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांनी तपास कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

भाटकरवाडा जाळपोळ प्रकरणात तक्रारदार तरुणाला आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीस अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटने मागील कारण समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमोर ही पहिलीच मोठी घटना होती. सण समोर असता दोन गटात तेढ वाढेल असा समाजकंटकांचा प्रयत्न होता मात्र सखोल तपासातून या प्रकरणाचा वेळीच उलगडा होऊन तक्रार करणाऱ्याने हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईंनकर यांनी माहिती देताना संशयित आरोपी निहाल मुल्ला याचे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.