रत्नागिरी:- शहरातील सातत्याने फुटणारी नळपाणी योजना, केबल टाकण्यासाठी खणण्यात आलेले रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे सुस्थितीत करण्यात यावेत, तसेच मोकाट जनावरांना पकडण्याची कारवाई तातडीने करावी अशी मागणी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेऊन केली आहे.
बुधवारी भाजपा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपाच्या पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. रत्नागिरीत पुढील कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत राजेश सावंत यांनी चर्चा केली. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन जलवाहिनी ÷अद्यापही फुटत असल्याने, पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतचे काम अर्धवट स्थितीत आहे. शहरात पाणी पुरवठ्यासह केबल टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खणण्यात येत आहेत, ते योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत. डांबरीकरण होत नसल्याने रस्त्यात चर निर्माण होत आहेत. शहरात अनेक भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत शहरात अनेक ठिकाणी उनाड गुरे रस्त्यावर बसलेली दिसून येतात. त्याचप्रमाणे रात्री फिरणार्या गुरांमुळे अपघात होत आहेत. ही गुरे पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात करावी अशी मागणी राजेश सावंत यांनी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे.
शहरातील होल्डींग काढण्याचे काम सुरु असून, काही ठिकाणी विनापरवाना होल्डींगला अभय देण्यात आले आहे. परवानगी घेतलेले होल्डींग काढण्यात येत असल्याचे सावंत यांनी मुख्याधिकार्यांना सांगितले. काही ठिकाणी हेतू पुरस्पर कारवाई नगर पालिकेकडून सुरु असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी केला. नगर पालिकेने सर्वच होल्डींग हटवून शहर होल्डींगमुक्त करावे अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत 40हून अधिक होल्डींग काढण्यात आली आहेत. कारवाई सुरु असल्याचे मुख्याधिकारी गारवे यांनी भाजपा पदाधिकार्यांना सांगितले. यावेळी राजन फालके, बाबू सुर्वे, शैलेश बेर्डे, प्रतिक देसाई, निलेश आखाडे, महिला पदाधिकारी सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, भक्ती दळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.