लांजा:- तालुक्यातील भांबेड बाजारपेठ या ठिकाणी झालेल्या दुकान चोऱ्यांच्या घटने प्रकरणी लांजा पोलिसांनी एका १८ वर्षीय संशयित चोरट्याला वाघणगाव येथून ताब्यात घेतले आहे. ५ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत घडलेल्या या चोरीच्या घटने प्रकरणी संशयित चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भांबेड बाजारपेठ येथील सिद्धिविनायक सायकल मार्ट आणि शिवशंभो इलेक्ट्रिक दुकान यांच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश केला होता. यावेळी सायकल दुकानातील रोख रुपये ७ हजार आणि इलेक्ट्रिक दुकानातील रोख रुपये ३ हजार २०० असा एकूण १० हजार २०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती.शुक्रवार दि.५ एप्रिल रोजी रात्री ९.१५ ते शनिवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यानंतर पाठोपाठ आठ दिवसांतच .१२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून ते रविवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास
भांबेड पेठदेव बाजारपेठेतील प्रमोद जगन्नाथ नागवेकर ज्वेलर्स नावाच्या सोने चांदी विक्रीच्या दुकानातून अज्ञाताने दुकानाच्या छपराची कौले काढून आत मध्ये प्रवेश करत दुकानात दुरुस्ती करता आलेली व ड्रॉवरमध्ये ठेवलेली सोन्याची चैन आणि रोख रक्कमेवर डल्ला मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी प्रमोद जगन्नाथ नागवेकर (वय-५९, रा.प्रभानवल्ली बनखोरवाडी, ता.लांजा) यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोने विक्रीच्या दुकानातून ड्रॉवरमध्ये ठेवलेली २० हजार रुपयांची सोन्याची चैन व रोख रक्कम २ हजार ८०० रुपये असा एकूण २२ हजार ८०० रुपयांचा किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती.
गेल्या आठ दिवसांत भांबेड येथे चोरीच्या पाठोपाठ दोन घटना घडल्यानंतर लांजा पोलिसांनी या तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने आणि गोपनीय माहितीद्वारे हर्षल चंद्रकांत गुरव (वय १८, रा. डोंगरेवाडी वाघणगाव, ता.लांजा) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संबंधित संशयिता विरोधात भा.दं.वि.कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे आणि लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.