भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक

बहादूरशेख नाक्यावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बांधकाम मजुरावर दगडफेक करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश वसंत नलावडे (३२, रा. गांधीनगर वडार कॉलनी, चिपळूण) हे १९ मार्च २०२६ रोजी रात्री ७:४५ वाजण्याच्या सुमारास सेंट्रिंगचे साहित्य आणण्यासाठी बहादूरशेख नाका येथील भगवती हार्डवेअर दुकानासमोर गेले होते. दुकान बंद असल्याने ते आपल्या गाडीजवळ थांबले होते. त्याच वेळी त्यांच्या ओळखीचे दोन व्यक्ती, विश्वनाथ हनुमंत पवार (३५) आणि व्यंकट बद्री पवार (३०), हे आपसात भांडण करत होते. हे भांडण सोडवण्यासाठी महेश नलावडे तिथे गेले असता, दोन्ही आरोपींचा राग अनावर झाला.

​आरोपींनी नलावडे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. इतकेच नव्हे तर, आरोपी क्रमांक १ विश्वनाथ पवार याने जमिनीवर पडलेला दगड उचलून नलावडे यांच्या उजव्या बाजूच्या जबड्यावर जोरात मारला. या हल्ल्यात नलावडे गंभीर जखमी झाले आहेत.

​या घटनेनंतर महेश नलावडे यांनी २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विश्वनाथ पवार आणि व्यंकट पवार (दोघेही रा. माळेवाडी चिपळूण, मूळ रा. कर्नाटक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ​कलम ११५ (२), ​कलम ११८ (१), ​कलम ३५२, ​कलम ३ (५) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.