भर रस्त्यातील मारहाणप्रकरणी जनहित याचिका

आपची उच्च न्यायालयात दाद ; लोकशाहीला तडा देणारी घटना

रत्नागिरी:- शहरातील मजगावरोड येथे भर रस्त्यामध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्याला झालेल्या बेदम मारहाणप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी रत्नागिरीचे जिल्हा संयोजक ज्योतिप्रभा पाटील यांनी ही दाद मागितली आहे. लोकशाहीच्या अखंडतेला तडा देणारी ही गंभीर घटना आहे. आठवडा उलटून गेला तरी हल्ला झालेल्या पीडिताने या सार्वजनिक हिंसाचाराविरोधात तक्रार केलेली नाही किंवा पोलिसांनी हस्तक्षेप करून या गंभीर दखलपात्र गुन्ह्यांची दखल घेतली नाही. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आठवडाभरापूर्वी मजगावरोड येथील आयसीआयसी बॅंकेच्यासमोर भर रस्त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य सोलकर यांना मारहाण झाली होती. एक व्यक्ती त्यांना गळपट्टी धरून वारंवार कानशिलात मारत होती. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर पाठलाग करून त्यांना पकडले आणि पुन्हा मारहाण करण्यात आली असे चित्रण असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही मारहाण वैयक्तिक देवाणघेवाण की राजकीय कुरघोडीतून करण्यात आली, याची माहिती समजू शकलेली नाही; मात्र त्यानंतर या घटनेची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही. हे प्रकरण निवळत असताना आपचे रत्नागिरी जिल्हा संयोजक ज्योतिप्रभा पाटील यांनी हा विषय उचलून धरला आहे. त्यांनी या घटनेबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागितली आहे.
रत्नागिरीत राजकीय दडपशाहीचे “सिंधुदुर्ग मॉडेल” कदापि होऊ देणार नाही. रत्नागिरीच्या लोकशाही अखंडतेला तडा देणारी एक गंभीर बाब आहे. या घटना घडून जवळपास एक आठवडा उलटून गेला आहे. हा हल्ला झालेल्या पीडिताने सार्वजनिक हिंसाचारानंतर कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून या गंभीर दखलपात्र गुन्ह्यांची दखल घेतली नाही. जोपर्यंत या सार्वजनिक हिंसाचाराचे गुन्हेगार आणि त्यांना प्रवृत्त करणारे राजकीय घटक मोकाट फिरत आहेत तोपर्यंत रत्नागिरीतील नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. म्हणून या मारहाणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेतील कलम २२६ अंतर्गत सोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत स्वदखल कारवाईची मागणी केली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांना व पोलिस यंत्रणेला याबाबत कळवले आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे, अशी माहिती पाटील यानी दिली.