भर दिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

दापोली:- तालुक्यातील श्रीरामनगर पाजपंढरी येथे घरफोडी करुन चोरट्याने घरात घुसून तब्बल ३ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ७ हजार रुपयांच्या रोख रकमेसह ३ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

याबाबतची फिर्याद सुरेश चंद्रकांत चोगले (३५, रा. श्रीरामनगर, पाजपंढरी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश चंद्रकांत चोगले हे दुपारी घरामध्ये झोपलेले होते. त्यावेळी घरात अन्य कोणी नसल्याची खात्री करुन चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लाल रंगाच्या फायबर पेटीचे कुलूप उचकटून चोरट्याने आत ठेवलेली रोख रक्कम व दागिने चोरुन नेले. यामध्ये ७हजार रुपये रोख, ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ३लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी हा परिसरातीलच व माहितगार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरट्याने घरातील इतर कोणत्याही वस्तूला हात लावलेला नसून ज्या पेटीमध्ये दागिने व पैसे ठेवलेले होते त्याच पेटीला लक्ष्य करीत चोरी केल्याचे पुढे येत आहे.