Sunday, May 31, 2026
spot_img
Home गुहागर भरधाव मोटारसायकल वहाळात कोसळून तरूणाचा मृत्यू

भरधाव मोटारसायकल वहाळात कोसळून तरूणाचा मृत्यू

गुहागर:- जयगड येथून शिवणे गावाकडे निघालेल्या एका तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास खोडदे निवातेवाडी येथील वहाळात घडली. स्वप्निल यशवंत सुर्वे (वय ३५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल सुर्वे हा २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास आपली मोटारसायकल (क्रमांक MH-48-BA-5752) घेऊन जयगड येथून आबलोली मार्गे शिवणे गावाच्या दिशेने निघाला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास खोडदे निवातेवाडी परिसरातील रस्त्यावरून जात असताना, मोटारसायकलचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला. यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वहाळात कोसळली. या अपघातात स्वप्निलचे डोके खडकावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

​या घटनेची माहिती मिळताच योगेश महादेव सुर्वे (वय ४३) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी स्वप्निल सुर्वे याच्यावरच भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अतिवेगाने गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
​मृत स्वप्निल हा मूळचा गुहागर तालुक्यातील शिवणे बौद्धवाडी येथील रहिवासी असून, सध्या नालासोपारा येथे वास्तव्यास होता. या दुर्दैवी घटनेने सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.