भरधाव क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

रत्नागिरीः– मिऱ्या-कोल्हापूर मार्गावरील फिनोलेक्स वसाहती नजीकच्या वळणावर भरधाव वेगाने आलेल्या क्रेनने दुचाकीस्वाराला चेंडुसारखे उडवले. क्रेनच्या धडकेत दुचाकी चालक प्रकाश विलास गोसावी (वय ३० रा.विमानतळ) हे पुलावरुन खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

परटवणेहून उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर क्रेन (क्रमांक एन एल ०२ के.५१७४) जात असताना फिनोलेक्स कॉलनीच्या पुढील उतारात आल्यानंतर चालकाचा क्रेनवरील ताबा सुटला. उतारात हेलखावे खात क्रेन येत असल्याचे दिसताच समोरुन आलेली कार (क्रमांक एमएच ०८ ए एन ६६५८) च्या चालकाने कार डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली उतरवून उभी केली. तोपर्यंत क्रेनने कारला धडक देत पुढील वळणावर गेली. यावेळी समोरुन आलेल्या दुचाकीस्वार प्रकाश विलास गोसावी यांना क्रेनची धडक बसताच ते पुलावरुन खाली कोसळले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

भरधाव वेगात असलेल्या क्रेनने पुलाच्या एका बाजूचा कठाडा तोडून पुलावरुन खाली उतरली. या अपघातानंतर क्रेन चालक घटनास्थळावरुन गायब झाला होता. अपघाताची माहिती मिळताच शहर, ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत प्रकाश गोसावी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन रात्री उशिरा क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातात मृत झालेल्या प्रकाश गोसावी यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आहेत.