भटक्या कुत्र्यांचा सहा महिन्यात 1 हजार 409 जणांना चावा

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या मोकाट जनावरांच्या पाठोपाठ भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. या कुत्र्यांनी रस्त्यावर तसेच कॉलनी परिसरामध्ये धुमाकुळ घातला आहे. येथील काही कुत्री पिसाळलेली असून एप्रिल महिन्यापासून सहा महिन्यात 1 हजार 409 जणांचा चावा घेतला आहे. या सर्वांना रेबीजची लस देण्यात आली आहे.

रेबीज बद्दल जनजागृती तसेच काय काळजी घ्यावी यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर नुकतीच स्व.शामरावजी पेजे सभागृह, जि.प.रत्नागिरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्याद्वारे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना रेबीज आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सध्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी रेबीज ची लस मोफत उपलब्ध असून, एप्रिल 2024 पासून एकूण श्वानदंश झालेल्या 1409 रुग्णांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली असून, नागरिकांनी रेबीज आजाराबद्दल माहिती घेऊन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
रेबीज हा प्राण्याकडून मानवास होणारा (झुनोटिक) विषाणूजन्य आजार असून, हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. रेबीज हा आजार कुत्रे, मांजर आणि वन्यप्राण्यांसह सस्तन प्राण्यांत संक्रमित होऊन लाळेद्वारे पसरतो. सामान्यतः चाव्याद्वारे, ओरखडे किंवात्वचेच्या थेट संपर्काद्वारे (उदा. डोळे, तोंड किंवा उघड्या जखमा) होतो. मानवी रेबीज मृत्यूचे बहुसंख्य स्त्रोत कुत्रे आहेत, जे मानवांना होणार्‍या सर्व रेबीज संक्रमणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे.

कोणत्याही प्राण्याचा चावा रेबीजकरिता कारणीभूत ठरू शकतो. रेबीजच्या प्राण्याच्या वर्तनामध्ये अचानक बदल होणे, उत्तेजक वर्तन, भ्रम, समन्वयाचा अभाव, हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) आणि एरोफोबिया (ताजी हवेची भीती) हे बदल आढळतात.कार्डिओ- रेस्पीरेटरी अरेस्टमुळे काही दिवसांनी मृत्यू होतो.