भगवतीनगर सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

सर्किट बेंचचा आदेश; कार्यभार देण्यास टाळाटाळीची तक्रार

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे- भगवतीनगरच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली आहे. प्रगती भोसले यांना सरपंचपदाचा कार्यभार पूर्ववत देण्याबाबत भगवतीनगर ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तरीही कार्यभार न दिल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन कार्यभार देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.

भोसले यांनी याबाबतची माहिती दिली. गेली दोन वर्षे ग्रामसेवकांच्या व इतर कर्मचाऱ्यांची गैरहजेरी तसेच विरोधकांच्या तक्रारींमुळे भगवतीनगर ग्रामपंचायत चर्चेत आहे. गावातील काही विरोधकांनी तक्रार केल्यावरून कोकण विभागीय आयुक्त यांनी भगवतीनगरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच प्रगती प्रमोद भोसले यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उपसरपंच राजवाडकर यांच्याकडे – तात्पुरता सरपंचपदाचा पदभार दिला होता. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची रिकामीच होती, त्याविरोधात प्रगती भोसले यांनी मंत्रालयाच्या कमिटीकडे अपील केले होते. मात्र, त्यावरची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात होती.

या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे भोसले यांनी अपील दाखल केले होते. पहिल्याच तारखेला न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती देत मंत्रिमंडळ कमिटीने चार आठवड्यांत अपिलावर निर्णय देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रगती भोसले यांच्या विरोधकांना चांगलाच झटका बसला असून, त्यांना पुन्हा सरपंचपदाचा कार्यभार देण्याचा आदेश केला आहे; परंतु अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून त्यांना सरपंचपदाचा कार्यभार न दिल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन कार्यभार देण्याची मागणी केली आहे.