बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून हाणामारी

कोचरी बौद्धवाडी येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल

लांजा:- लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून सुरू झालेल्या या वादात एकाला गंभीर दुखापत झाली असून, लांजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश राजाराम काबळे (वय ४४) आणि आरोपी कुंदन अनंत कांबळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. गेल्या एका वर्षापासून त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून दोन गट पडले असून वाद सुरू आहेत. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ७:३० च्या सुमारास दिनेश कांबळे हे घराशेजारील बौद्धविहाराच्या बाहेर अगरबत्ती लावण्यासाठी गेले होते.

​त्यावेळी कुंदन कांबळे याने त्यांना “तू कशाला अगरबत्ती लावतोस, इथून निघून जा” असे म्हणून हटकले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि कुंदनने फिर्यादींना हाताने मारहाण व ढकलाढकली करण्यास सुरुवात केली.

​हा वाद सुरू असतानाच कुंदनचे भाचे निलेश अनिल जाधव (वय २३) आणि अजय अनिल जाधव (वय २८) हे देखील तिथे आले. त्यांनीही दिनेश कांबळे यांना मारहाण करून खाली पाडले. यावेळी आरोपी निलेश जाधव याने हातातील कडा काढून दिनेश यांच्या डोळ्याखाली मारून त्यांना जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दिनेश यांच्या पत्नीलाही आरोपींनी धक्काबुक्की केली.

​या प्रकरणी दिनेश राजाराम काबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.