संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये-भेरेवाडी येथे किरकोळ कारणातून एकाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवार 13 मे रोजी रात्री 12.30 वा. सुमारास घडली. विघ्नेश भेरे (28), गणेश भेरे (25), आदित्य भेरे (23), दिपक भेरे (27), बळीराम भेरे (57, सर्व रा.बोंड्ये भेरेवाडी,संगमेश्वर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात अविनाश सुरेश गुरव (32, रा.बोंड्ये भेरेवाडी,संगमेश्वर) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकाच वाडीती राहणारे आहेत. 12 मे रोजी त्यांच्या गावात सार्वजनिक पुजा करण्यात आली होती. त्याच्या खर्चाबाबत 13 मे रोजी रात्री 10.30 वा.वाडीतील यशवंत गुडेकर यांच्या अंगणात वाडीची मिटिंग बोलवण्यात आली होती.
रात्री 12.30 वा. सुमारास संशयित विघ्नेश भेरेने फिर्यादीकडे बघून आज कोणात किती दम आहे. ते बघून घेतो असे सारखे-सारखे बोलत होता. तेव्हा फिर्यादी अविनाश गुरवने त्याचा चुलत भाउ सिध्देश गुरवला कल्पेश गुरव आणि त्याचे वडिल दत्ताराम गुरव यांना बोलावण्यास पाठवून कोणात किती दम आहे ते बघू असे बोलला. याचा राग आल्याने संशयितांनी त्याला हातांच्या थापटांनी तसेच लाथेने मारहाण केली. दरम्यान अविनाशची आई त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली असता बळीराम भेरेने तिच्या गालावर चापट मारुन अविनाशला भेटशिल तिथे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 147, 149, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.