रत्नागिरी:- ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी बुधवारी पुकारलेल्या बंदला रत्नागिरी जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्यावतीने करण्यात आला. जिल्ह्यात 952 मेडीकल स्टोअर असून बुधवारी ती 24 तास बंद ठेवण्यात आली होती.
देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी एकदिवसीय बंद पुकारला होता.
ऑनलाईन आणि बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने हा देशव्यापी संप आयोजित केला होता.
केमिस्ट संघटनांच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. तसेच बेकायदेशीर पद्धतीने औषधांची विक्री होत असल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये या बंदला प्रतिसाद मिळला. अनेक औषध दुकाने दिवसभर बंद राहणार असल्याने नागरिकांना औषधे मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या.
कोकणामध्ये जवळपास चार हजार औषध दुकाने आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 952 दुकाने असून रत्नागिरी शहरात 279 औषध दुकाने आहेत. रत्नागिरीत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे उन्मेश शिंदे व रत्नागिरीतील पदाधिकार्यांनी औषध दुकानांबाहेर जमून शासनाच्या धोरणांचा निषेध केला.









