गुहागर:- गुहागर तालुक्यातील उंबराठ खुर्द येथील आंबेकरवाडीतून नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्धाचा मृतदेह अखेर सोमवारी (१५ डिसेंबर) टाळये नदीकिनारी आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत शंकर आंबेकर (वय ७१, रा. उंबराठ खुर्द, आंबेकरवाडी, ता. गुहागर) हे दिनांक ६ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले होते. ते बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत भागोजी आंबेकर यांनी ८ डिसेंबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात गणपत आंबेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, बेपत्ता असलेल्या गणपत शंकर आंबेकर यांचा मृतदेह सोमवार, १५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उंबराठ खुर्द, आंबेकरवाडी येथील टाळये नदीकिनारी आढळून आला. मृतदेह मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना ६ डिसेंबर ते १५ डिसेंबर या मुदतीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी अकस्मात मृत्यू अहवाल क्रमांक ४२/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.









