पालशेत येथील घटना; गुहागर पोलिसांत नोंद
गुहागर:- गुहागर तालुक्यातील पालशेत येथील गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह माळरानावरील एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. सिद्धेश अशोक घातकर (वय २८, रा. पालशेत बाजारपेठ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा २८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घरी होता. “आई, मला जेवायला वाढ” असे सांगून तो घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून न आल्याने २९ एप्रिल रोजी गुहागर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुहागर पोलीस आणि नातेवाईक सिद्धेशचा शोध घेत असतानाच, सोमवार ४ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पालशेत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या पाठीमागील माळरानात एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे उघड झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्धेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.









