बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी कार चालकाला दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- बेदरकारपणे कार चालवून युटर्न घेताना दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणातील कार चालकाला न्यायालयाने बुधवार 5 एप्रिल रोजी 2 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

संजय विष्णू पाटील (47,मुळ रा.मेंढ,सातारा सध्या रा.साळवीस्टॉप,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात दुचाकी चालक अमोल भिकाजी शिंदे (29,रा.चवे,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानूसार,13 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 2.45 वा.अमोल शिंदे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एबी-6272) घेउन मारुती मंदिर ते साळवीस्टॉप असा जात होता.त्याच सुमारास संजय पाटील हा आपल्या ताब्यातील वोक्सवॅगन वेन्टो कार (एमएच-01-बीजी-5535) घेउन साळवीस्टॉप ते मारुती मंदिर असा येत होता.दोन्ही वाहने शिवाजीनगर येथील रॉयल मेडीकल समोर आली असता संजय पाटीलन दुभाजकातून युटर्न घेत परकार हॉस्पिटलच्या बाजुला जात असताना त्याने अमोल शिंदेच्या दुचाकीला धडक देत अपघात केला.

या अपघातात अमोल शिंदे जखमी झाला होता.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस हेड काँस्टेबल कोकरे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.बुधवारी या खटल्याचा निकाल देताना रत्नागिरी 2 रे न्यायदंडाधिकारी पी.एस.गोवेकर यांनी गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी संजय पाटीलला 2 हजार 500 रुपये दंड तो न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.