बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे सिंधुदुर्गातील तिघे राजापूर येथे जेरबंद; वन विभागाची कारवाई

रत्नागिरी:- बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने जेरबंद केले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री ९.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. पेट्रोल पंपावर तीन संशयित दुचाकी स्वारांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये बिबट्या वन्य प्राण्याची कातडी आढळून आल्याने वन्य प्राण्याच्या तस्करी बाबत आरोपी यांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. 

जयेश बाबी परब ( २३ रा. शिरोडा,ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), दर्शन दयानंद गडेकर (20, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) आणि दत्तप्रसाद राजेंद्र नाईक ( 22 रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) अशी तीन संशयितांची नावे आहेत. आरोपीकडून बिबट्या या प्राण्याची कातडी जप्त करुन घेण्यात आली आहे. वरील सर्व आरोपींनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ चा भंग केलेला आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिघांना दोन मोटरसायकली जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपीकडून जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. सदर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलेला असून पुढील तपास सुरू आहे. 

तीनही संशयित आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता श्री.ओमकार अनिल गांगण, सरकारी वकील यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू योग्य रित्या न्यायालयासमोर मांडल्याने मे. न्यायालयाने सदर आरोपीना ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे. सदरची कार्यवाही मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहा. वनसंरक्षक श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल राजापूर, श्री. स.व.घाटगे, वनपाल लांजा श्री. दि.वि.आरेकर, वनपाल संगमेश्वर श्री. तौ.र.मुल्ला, वनरक्षक राजापूर सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले श्री. सागर पताडे, वनरक्षक साखरपा, श्री. न्हा.नु.गावडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधिर, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा श्री. राहूल गुंठे यांनी कार्यवाही पार पाडली आहे.