रत्नागिरी:- बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी किनार्यावर लाटांचे तांडव सुरु आहे. रविवारी (ता. 11) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आलेली त्सुनामीसारखी अजस्त्र लाट किनार्यावरील पर्यटकांच्या मनात धडकी भरवणारी होती. लाटेबरोबर वाहत आलेले पर्यटक किनार्यावरील धक्क्यावर आपटून जखमी झाले. किनार्यावरील दहाहून अधिक स्टॉलधारकांचे साहित्य वाहून गेले.

शाळा, महाविद्यालये चालू आठवड्यात सुरु होत असल्यामुळे गणपतीपुळेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे त्यात अधिक भर पडली. दिवसभरात सुमारे 20 हजार पर्यटक गणपतीपुळे येऊन गेल्याची नोंद श्रींच्या मंदिरात झाली आहे. सायंकाळच्या सुमारास ओहोटीवेळी समुद्राचे पाणी ओसरत होते. त्यामुळे पर्यटकही निर्धास्तपणे किनार्यावर फिरत होते. दोन दिवसांपुर्वी मोठ्या लाटेने काही व्यावसायीकांचे नुकसान झाले होते. तो धडा घेऊन सुमारे पंधरा स्टॉल धारकांनी किनार्यावर सुरक्षित ठिकाणी स्टॉल उभारले होते. नारळ, भेटपूरीसह अन्य वस्तूंची विक्री ते करत होते. सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वेगाने एक लाट आली. त्यापाठोपाठ दुसरी अजस्व लाट वेगाने किनार्यावर धडकली. सुरवातीला आनंद वाटणार्या पर्यटकांच्या मनात धडकी भरली. किनार्यावरील कट्ट्यावर आनंद घेणार्या पर्यटकांचीही त्रेधातिरपीट उडाली. वाळूमधून धावताना काही पर्यटकांचे पाय मुरगळले, लाटेच्या वेगाने धक्क्यावर आपटलेल्या पर्यटकांनाही दुखापत झाली. त्यातील चार जणांना उपचारासाठी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. लाट जशी वेगात आली, तशीच ती परतलीही. परतत असतानाच एक मुलगा पाण्याबरोबर आत ओढला जात होता. जीवरक्षक आणि पर्यटकांनी त्याला पकडले. सुदैवाने या मोठ्या लाटेमुळे जीवीत हानी झाली नाही. यामध्ये किनार्यावरील जीवरक्षकांनी पर्यटकांची चांगलीच सुरक्षा ठेवली. किनार्यावर असलेल्या दहाहून अधिक स्टॉलधारकांचे साहित्य वाहून गेले. हा प्रकार झाल्यानंतर पोलिस प्रशासन, जीवरक्षकांनी समुद्रात कुणालाही सोडायचे नाही असा निर्णय घेतला. किनार्यावर जाणार्या पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले होते.