Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी बावनदी येथे ट्रेलरची टेम्पोसह दुचाकीला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

बावनदी येथे ट्रेलरची टेम्पोसह दुचाकीला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी बावनदी येथील अवघड उतारावर ट्रेलरने एका दुचाकीला आणि त्यानंतर टेम्पोला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात टेम्पो चालक प्रणय रविंद्र काडगे (रा. शिरवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात १५ जानेवारी रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडला.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रेलर चालक मोहम्मद कासिम इलियाज खान (४८, रा. बिहार) हा आपला ट्रेलर (क्रमांक MH 01 EM 2951) घेऊन गोवा ते मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. निवळी बावनदी येथील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH 42 BT 4710) पाठीमागून जोरदार धडक दिली.
​हा अपघात करून ट्रेलर पुढे गेला आणि बावनदीच्या बाजूकडून येणाऱ्या टेम्पोला (क्रमांक MH 07 AJ 4324) समोरून भीषण धडक दिली. या धडकेत टेम्पोचे प्रचंड नुकसान झाले असून चालक प्रणय काडगे यांना आपला जीव गमवावा लागला.

​याप्रकरणी संजना संजय पवार (रा. निवळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयगड पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. १६ जानेवारी रोजी पहाटे ४:१४ वाजता या अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली.
​निवळी बावनदी परिसरात सतत होणाऱ्या अपघातां मुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भरधाव वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.