३० प्रवासी जखमी; वायू गळतीमुळे भीतीचे वातावरण
रत्नागिरी:- रविवारी सकाळी बावनदी येथे एक भीषण अपघात झाला आहे. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला निवळीकडून येणाऱ्या सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली असून, ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या धडकेमुळे ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट दरीत कोसळली. अपघातानंतर टँकरमधून वायू गळती सुरू झाल्याने घटनास्थळी आणि परिसरातील प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.